छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या विविध विभागांतील २२२ रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख बुधवार (दि.१८) होती; मात्र उमेदवारांकडून मुदत वाढविण्याची मागणी होत असल्याने प्रशासनाने ती ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने या भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस (IBPS) या संस्थेशी करार करून कार्यारंभ आदेश दिले होते. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १७ फेब्रुवारीपासून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अर्जासाठी केवळ एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी अधिक वेळ लागल्याने मुदतवाढीची मागणी वाढली होती.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत अर्जाची अंतिम तारीख वाढविली आहे. या भरती प्रक्रियेत सर्वाधिक ११९ पदे अग्निशमन विभागात भरण्यात येणार आहेत. यामध्ये उप अग्निशमन अधिकारी, अग्निशामक तसेच चालक यंत्रचालक पदांचा समावेश आहे. याशिवाय कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३२, स्वच्छता निरीक्षक १२, रोखपाल १२, अनुरेखक ९, पशुधन पर्यवेक्षक ७ आणि उद्यान सहाय्यक ६ पदांसह इतर विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.
मुदतवाढ मिळाल्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला असून, अधिकाधिक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*