छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय (घाटी) येथे बनावट नियुक्ती आदेशाच्या आधारे ‘भांडारपाल’ पदावर रुजू होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा प्रकार उघडकीस आला असून, तांत्रिक चुकीमुळे हा बनाव फसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सतिष काकाजी कोलते (रा. भालगाव, ता. फुलंब्री) याच्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी दुपारी सुमारे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान सतिष कोलते घाटी रुग्णालयात दाखल झाला. त्याने स्वतःला ‘भांडारपाल वर्ग-३’ पदावर नियुक्ती झाल्याचे सांगत संबंधित नियुक्ती आदेशाची प्रत कनिष्ठ लिपिक शेख अरबाज यांच्याकडे सादर केली. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करताच काही बाबींमध्ये संशय निर्माण झाल्याने ही माहिती तत्काळ प्रशासकीय अधिकारी महेश रघुनाथराव गावडे यांना देण्यात आली.

गावडे यांनी संबंधित आदेशाचे बारकाईने निरीक्षण केले असता, त्यामध्ये नमूद पदनाम आणि पदभाराबाबत विसंगती आढळून आली. आदेशावर ‘आरोग्य विभाग आयुक्तालय, मुंबई’ असा शिक्का असला, तरी नियुक्ती ही सरळसेवेऐवजी पदोन्नतीच्या माध्यमातून झाल्याचा उल्लेख होता. ही तांत्रिक चूक लक्षात येताच प्रशासनाचा संशय अधिकच बळावला.

यानंतर १६ मार्च रोजी कार्यालयातील अधिकृत ईमेल व टपाल नोंदी तपासण्यात आल्या. मात्र, अशा प्रकारचा कोणताही आदेश शासनाकडून प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी आदेश बनावट असल्याचे प्रमाणित केले. त्यानुसार १७ मार्च रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनिषा केदार करत आहेत. या घटनेमुळे शासकीय भरती प्रक्रियेत बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत असून, प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

936 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क