छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील २४ तासांपासून जॅकवेलमधील पाणीपातळी स्थिर असून कुठेही लिकेज आढळून आलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या मजबुतीबाबत सकारात्मक चित्र समोर आले आहे.

सदर जॅकवेलमध्ये २२ मार्चपर्यंत सुमारे पाच मीटरपर्यंत पाणी साठवून ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण करून पंप सुरू करण्यात येणार असून, जॅकवेलमधील पाणी मुख्य जलवाहिनीत सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी न्यायालयानेही मान्यता दिली असून, प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.

या जॅकवेल प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी ४:४० वाजता गोदावरी नदीच्या पात्रातून सायफन पद्धतीने पाणी जॅकवेलमध्ये सोडण्यात आले. काही मिनिटांतच पाणीपातळी पाच मीटरपर्यंत पोहोचली. शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली असता पाणीपातळी कायम असल्याचे दिसून आले. जॅकवेल परिसरात कुठेही पाणी गळती होत नसल्याचेही स्पष्ट झाले.

दरम्यान, जॅकवेल वापरण्यासाठी १०० टक्के सुरक्षिततेचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले होते. त्यानुसार जीव्हीपीआर कंपनीने तातडीने प्रमाणपत्र सादर केले. मात्र, या प्रमाणपत्रावरील स्वाक्षरीबाबत अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. अधिकृत अधिकाऱ्याची सही असूनही या मुद्द्यावरून प्रक्रिया विलंबित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनी यांच्यातील वाद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

587 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क