छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील परिचारिकांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन तासांचे ‘काम बंद’ आंदोलन केले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी सेवा थांबवून घोषणाबाजी व निदर्शने केली. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातही शासकीय परिचारिका संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.

राज्यातील परिचारिका संवर्गातील हजारो रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी संघटनेकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असताना रिक्त पदांमुळे सेवा प्रभावित होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

फेडरेशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करणे, नवीन आकृतीबंधाला शासनाची मंजुरी देणे, रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे आणि सर्व रिक्त पदांवर सरळ सेवेद्वारे भरती प्रक्रिया सुरू करणे यांचा समावेश आहे. परिचारिका, परिसेविका, विभागीय परिसेविका, पाठ्यनिर्देशिका, सहाय्यक अधिसेविका आणि अधिसेविका या विविध पदांवरील रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्याध्यक्ष इंदुमती थोरात यांनी शासनाने तातडीने मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात शुभमंगल भक्त, मकरंद उदयकार, प्रवीण व्यवहारे, वंदना कोळनूरकर, प्रतिभा अंधारे, कालिंदी इधाटे, लता सोंडगे, अनुजा टेकाळे, मुजम्मिल पठाण, गणेश गावडे, दादासाहेब कासार, मिलिंद तोगारवाड यांच्यासह राज्यभरातील हजारो परिचारिका सहभागी झाल्या.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

167 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क