छत्रपती संभाजीनगर : मृत्यूचा दरवाजा ठोठावून सुखरूप परत येणे म्हणजे काय, याचा प्रत्यय शहरात आला आहे. केवळ २५ आठवडे आणि ४ दिवसांच्या गर्भावस्थेत जन्मलेल्या आणि जन्मतः अवघे ७०० ग्रॅम वजन असलेल्या समर्थ या चिमुकल्याने तब्बल ९४ दिवस मृत्यूशी झुंज देत जीवनसंघर्ष जिंकला. जन्माच्या दहाव्या दिवशी जठर फाटण्याची गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्याच्यावर आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आईच्या गर्भाशयातील द्रवाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने तातडीने प्रसूती करणे आवश्यक होते. प्रसूती तज्ज्ञ डॉ. हेमा मिनियार यांनी सिझेरियनद्वारे प्रसूती केली. जन्मानंतर अत्यंत नाजूक अवस्थेतील समर्थला तातडीने अमृत बाल रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. वरिष्ठ नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. रमेश बजाज यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
जन्माच्या दहाव्या दिवशी समर्थच्या जठराला छिद्र पडून ते फाटल्याचे निदर्शनास आले. अवघे ७०० ग्रॅम वजन असल्याने शस्त्रक्रिया मोठे आव्हान होते. मात्र डॉक्टरांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला. प्रकृती सुधारत असतानाच दोन्ही बाजूंचा इंग्वायनल हर्निया तसेच नाभीचा हर्निया आढळून आला. त्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली.
सलग ९४ दिवसांच्या नवजात अतिदक्षता उपचारांनंतर समर्थची प्रकृती स्थिर झाली. अखेर ९५व्या दिवशी त्याचे वजन २ किलो १०० ग्रॅम झाले आणि त्याला सुखरूप आईच्या स्वाधीन करण्यात आले.
७०० ग्रॅम वजनाच्या नवजात बाळावर जठर फाटण्याची शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मिळ आणि जोखमीची असल्याचे डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले. तर अशा कमी वजनाच्या बाळाला तीन शस्त्रक्रियांनंतर वाचवणे हे वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय यश असल्याचे डॉ. रमेश बजाज यांनी नमूद केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*