छत्रपती संभाजीनगर : ‘Safe Food Safe Maharashtra’ या विशेष मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील ‘मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्ट’ वर कारवाई केली आहे. पेढीच्या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे आणि अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने अन्न व्यवसायाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच सर्व त्रुटींची पूर्तता होईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी मो. फ. सिद्दीकी यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी या पेढीची सखोल तपासणी केली. या तपासणीत एकूण ६४ गुणांपैकी पेढीला केवळ ३८ गुण म्हणजेच ६० टक्के गुण मिळाले. त्यामुळे पेढी ‘नॉन-कॉम्प्लायन्स’ अर्थात नियमांचे पालन न करणारी असल्याचे आढळून आले.

तपासणीदरम्यान स्वयंपाकघराच्या छतामध्ये उघडा भाग असून त्याला सुरक्षात्मक जाळी लावलेली नसल्याचे आढळले. त्यामुळे कीटक आणि उंदीर आत जाण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने नमूद केले. अन्न तयार करण्याच्या ठिकाणच्या भिंतींवर ओल, तेल आणि धूळ साचल्याचेही आढळून आले.

पेस्ट्री व दुग्धजन्य पदार्थ साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डीप फ्रीझर आणि रेफ्रिजरेटरमध्ये तापमानाचे निरीक्षण करण्यासाठी आवश्यक टेम्परेचर इंडिकेटर उपलब्ध नव्हते. पेढीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा अद्ययावत जलविश्लेषण अहवालही उपलब्ध नव्हता. यावेळी केवळ २०२२ सालचा जुना अहवाल आढळला.

कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसह नोंदींचाही अभाव

पेढीत अन्न हाताळणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. तसेच काम करताना ॲप्रन, हेडगिअर आणि हातमोजे वापरले जात नसल्याचे तपासणीत समोर आले. याशिवाय कच्च्या मालाच्या खरेदीची बिले, दैनंदिन स्वच्छतेचे वेळापत्रक आणि पेस्ट कंट्रोलचे रेकॉर्डही उपलब्ध नसल्याचे आढळले.

या त्रुटींमुळे अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाबी निदर्शनास आल्याने सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३२(३) अंतर्गत अधिकारांचा वापर केला. त्यानुसार ‘मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्ट’चे नोंदणी प्रमाणपत्र पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आले.

निलंबनाच्या कालावधीत या दुकानातून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक किंवा विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व त्रुटींची पूर्तता करून पुनर्तपासणी झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

 

376 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क