छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील मे. योगराज हॉटेलचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी २९ जुलै २०२६ रोजी हॉटेलची तपासणी केली होती. त्यावेळी आढळलेल्या त्रुटींप्रकरणी हॉटेल प्रशासनाला सुधारणा नोटीस देण्यात आली. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेऊन हॉटेलची फेरतपासणी करण्यात आली. या तपासणीतही आवश्यक सुधारणा झाल्या नसल्याचे आढळून आले.
हॉटेलच्या भिंती, छत आणि दरवाजांचे प्लास्टर व रंग खराब झालेला होता. खिडक्यांना कीटकरोधक जाळ्या नव्हत्या. तसेच कीटक व झुरळांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ड्रेनेज लाईनमध्ये आवश्यक सापळे बसवलेले नव्हते.
याशिवाय शाकाहारी आणि मांसाहारी तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न स्वतंत्रपणे ठेवले जात नसल्याचे आढळले. अन्न साठवणूक क्षेत्रातील कचरा वेळेवर हटवला जात नव्हता. आवश्यक कागदपत्रे व नोंदी जतन करण्यातही त्रुटी आढळल्या.
सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी दूर न केल्याने अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम ३२ आणि नियमन २.१.८ अंतर्गत हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
निलंबनाच्या कालावधीत हॉटेलमधून कोणत्याही अन्न पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली. हॉटेलवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*