वैजापूर : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थितीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी होत असल्याचे आढळून आल्याने वैजापूर शहरातील ‘नॅचरल डेअरी’चा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने २ ऑक्टोबर रोजी यशवंत कॉलनी, रामगिरी नगर परिसरातील या डेअरीची अचानक तपासणी केली. यावेळी ४२ हजार ८८० रुपये किमतीचा पनीर, क्रीम आणि तुपाचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान डेअरीचा प्लांट अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असल्याचे आढळले. फरशी तुटलेली, दरवाजे उघडे तसेच खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नसल्याचे निदर्शनास आले. प्लांटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या पिण्यायोग्य दर्जाबाबत आवश्यक चाचणी अहवालही उपलब्ध नव्हता.
डेअरीमध्ये येणाऱ्या कच्च्या दुधाची प्राथमिक तपासणी केली जात नसल्याचे तसेच दुधाचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले. दुधातील भेसळ तपासणीच्या नोंदीही आढळल्या नाहीत. दूध साठवण्यासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांऐवजी प्लॅस्टिक कॅनचा वापर केला जात असल्याचेही आढळले.
याशिवाय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत नसणे, उपकरणांच्या स्वच्छतेच्या नोंदी नसणे आणि कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचे प्रशासनाच्या तपासणीत स्पष्ट झाले. दूध हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन, हातमोजे व हेडगेअर नसल्याचे तसेच अन्न सुरक्षा विषयक प्रशिक्षणाचा अभाव असल्याचेही आढळले.
FSSAI निकषांनुसार झालेल्या तपासणीत डेअरीला ९४ पैकी केवळ १५ गुण मिळाले. त्यामुळे संस्थेला नियमांचे पालन न करणारी संस्था ठरवून अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
जप्त केलेल्या साठ्यात ५९ किलो पनीर, ११ किलो क्रीम आणि २८ किलो तुपाचा समावेश असून त्याची एकूण किंमत ४२ हजार ८८० रुपये आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*