छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. या कारवाईमुळे संबंधित केंद्राला खाद्यपदार्थांचे उत्पादन, विक्रीसाठी साठवणूक, विक्री तसेच वितरण करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी 2 सप्टेंबर 2026 रोजी आस्थापनेची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान विविध त्रुटी आढळून आल्याने FDAने 4 सप्टेंबर रोजी सुधारणा नोटीस बजावली होती. त्यानंतर संबंधित आस्थापनेने 23 सप्टेंबर रोजी आपला खुलासा सादर केला, तर 29 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. मात्र, त्याच दिवशी झालेल्या फेरतपासणीतही अनेक त्रुटी कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

तपासणीत अन्न, पॅकेजिंग साहित्य आणि रसायनांच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, खाद्यपदार्थांच्या नियमित प्रयोगशाळा चाचण्यांच्या नोंदी उपलब्ध नसणे, तसेच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याबाबत आवश्यक NABL मान्यताप्राप्त प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे आढळले.

याशिवाय अन्नकचरा व टाकाऊ वस्तूंची वेळेवर विल्हेवाट न लावणे, मापन व उपकरणांचे नियमित अंशांकन न करणे, कीटक नियंत्रणाचे अभिलेख अद्ययावत नसणे आणि जेवणाच्या जागेत जळमटे आढळणे, अशा त्रुटीही आढळल्या. डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र आणि वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र नसल्याचेही तपासणीत समोर आले.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील कलम 32 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. संबंधित आस्थापनेवर बारीक लक्ष ठेवून अहवाल सादर करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

567 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क