छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक क्राईम ब्रँच, सीबीआय आणि आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवत सायबर ठगांनी तब्बल 14 दिवस वृद्धेला व्हिडिओ कॉलवरून मानसिक दबावाखाली ठेवले. तिच्या पाच बँकांमधील एफडी मोडून घेत आरोपींनी ही रक्कम विविध खात्यांमध्ये वळती केली.
जालना रोड परिसरातील उच्चभ्रू वस्तीत वृद्ध महिला एकट्या राहत होत्या. त्यांचा मुलगा जामनगर येथे एका नामांकित कंपनीत कार्यरत असून मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे. 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तीने स्वतःची ओळख ‘राजन भिसे, नाशिक क्राईम ब्रँच’ अशी करून दिली.
तुमच्या नावावर मुंबईतील कॅनरा बँकेत खाते असून त्यातून दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत आणि ड्रग्ज व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ठगांनी केला. संबंधित खात्यात दोन कोटी रुपये असून त्यातील दोन लाख रुपये कमिशन म्हणून तुमच्या खात्यात जमा झाल्याचे सांगत, सहकार्य न केल्यास तुम्हाला आणि मुलाला अटक करण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर वृद्धेला दररोज सकाळी, दुपारी आणि सायंकाळी व्हिडिओ कॉलवर ठेवण्यात आले. 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात त्या ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये असल्याचा भास निर्माण करण्यात आला. आरोपींनी 21 सप्टेंबरला त्यांच्या पाच बँक खात्यांची आणि एफडीची माहिती घेतली. मुलाला धोका असल्याची भीती दाखवत कोणालाही माहिती न देण्याचा इशारा देण्यात आला.
मानसिक दबावामुळे वृद्धेने स्वतः बँकेत जाऊन एफडी मोडल्या आणि आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील 12 हून अधिक खात्यांमध्ये रक्कम वळवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कुटुंबीयांच्या लक्षात प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे तक्रार केली. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि उपनिरीक्षक गणेश गिरी यांनी तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासात 32 लाख रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, व्हिडिओ कॉलमध्ये आरोपी पोलिसांचा गणवेश परिधान करून मागे टेबल, तिरंगा आणि पोलिसांचा निळा ध्वज दिसेल अशा पद्धतीने विश्वास निर्माण करत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*