पैठण : शहरात रविवारी (दि. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील एका कापड दुकानासमोर हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये बाप-लेकीचा समावेश असून या घटनेने पैठण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात कृष्णा अशोक गायकवाड (२५), त्यांची पाच वर्षांची मुलगी छकुली कृष्णा गायकवाड (दोघे रा. राक्षी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) आणि अशोक गणेश भालेराव (३५, रा. आंतरवाली रहाटी, ता. घनसावंगी, जि. जालना) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे दोघे चिमुकली छकुलीला सोबत घेऊन दुचाकीवरून पैठणहून आगर नांदरच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक २ ची एसटी बस (एमएच ०६, बीएल ४३६९) पैठण शहरातून मार्गस्थ होत होती. शहरातील एका कापड दुकानासमोर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले. तिघांचे मृतदेह पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त एसटी बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दोघे सख्खे साडू, ऊसतोड मजूर
मृत कृष्णा गायकवाड आणि अशोक भालेराव हे दोघे सख्खे साडू होते. अहिल्यानगर आणि जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले दोघेही ऊसतोडीच्या कामासाठी पैठण तालुक्यातील आगर नांदर येथे कुटुंबासह राहत होते. अशोक भालेराव गेल्या पाच वर्षांपासून आगर नांदर परिसरात ऊसतोडीचे काम करीत होते, तर कृष्णा गायकवाड हे सुमारे सहा महिन्यांपूर्वी ऊसतोडीसाठी येथे आले होते.
रविवारी दोघेही चिमुकली छकुलीला सोबत घेऊन पैठण शहरात एकनाथांच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर आगर नांदरकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला एसटी बसची समोरासमोर धडक झाली आणि काही क्षणांतच तिघांचेही आयुष्य संपले.
अशोक भालेराव यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तर कृष्णा गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*