छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवरील ओळखीच्या व्यक्तीसारखा फोटो असलेल्या फेक प्रोफाइलद्वारे विश्वास संपादन करून ६० वर्षीय व्यावसायिकाची १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. बनावट ट्रेडिंग अॅपवर तब्बल ९० लाख ४५ हजार रुपयांचा नफा झाल्याचे भासवून, तो नफा काढण्यासाठी आणखी ४२ लाख ८२ हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. ३१ जुलै ते ५ ऑक्टोबर २०२६ या ६६ दिवसांत हा प्रकार घडला.
तक्रारदार पर्यावरण सल्लागार म्हणून काम करतात. ३१ जुलै रोजी त्यांना फेसबुक मेसेंजरवर ‘संदीपान रेड्डी’ नावाच्या प्रोफाइलवरून संदेश आला. प्रोफाइलवरील फोटो परिचित मित्राचा असल्याने त्यांनी त्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आरोपींनी त्यांना ‘ब्राईट फ्युचर २०२’ आणि ‘व्हिआयपी १६९’ या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.
या ग्रुपमध्ये ‘सान्वी वाधवा’ नावाच्या अॅडमिनसह इतर सदस्य शेअर बाजारातून अल्पावधीत मोठा नफा मिळत असल्याचे संदेश आणि बनावट स्क्रीनशॉट शेअर करत होते. त्यानंतर आरोपींच्या सांगण्यावरून तक्रारदाराने ‘स्टॉक्स सँप्रो-व्हिआयपी.कॉम’ या बनावट पोर्टलवर ट्रेडिंग खाते उघडले.
३१ जुलै ते ५ ऑक्टोबरदरम्यान तक्रारदाराने आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांवर एकूण १७ लाख रुपये ऑनलाइन पाठवले. त्यापैकी १ लाख ५० हजार रुपये परत मिळाल्याने व्यवहार खरा असल्याचा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला.
दरम्यान, बनावट पोर्टलवर शेअर्स, नफा आणि उपलब्ध रक्कम वाढत असल्याचे दाखवण्यात आले. त्यांचा पोर्टफोलिओ ९० लाख ४५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे भासवण्यात आले. मात्र, रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ४२ लाख ८२ हजार रुपये अतिरिक्त भरण्याची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्यास कारवाईची धमकीही देण्यात आली.
सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा बनावट अॅपमध्ये दाखवला जाणारा नफा आभासी असतो. गुंतवणूक करण्यापूर्वी ब्रोकरची सेबी नोंदणी तपासावी. अनोळखी लिंकवरून अॅप डाउनलोड करू नये. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*