छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये जेवायला जाताना ग्राहक अन्नाच्या चवीसोबतच स्वच्छतेवरही विश्वास ठेवतात. मात्र, अन्न तयार करण्याच्या ठिकाणीच स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले जात असतील, तर ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशीच गंभीर बाब छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी परिसरातील महाराणा प्रताप चौक येथील ‘मे. राजभोग हॉटेल’च्या तपासणीत समोर आली आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे.
तपासणीत मिळाले अवघे २१ टक्के गुण
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी हॉटेलची अचानक तपासणी केली. या तपासणीत अन्नसुरक्षेच्या निकषांनुसार हॉटेलला ८८ पैकी केवळ १८ गुण मिळाले. एकूण गुणांच्या तुलनेत ही टक्केवारी अवघी २१ टक्के आहे. तपासणी अहवालात हॉटेलची स्थिती ‘नियमांचे पालन नाही’ (Non-Compliance) अशी नोंदवण्यात आली.
स्वच्छतेसह अन्नसाठवणुकीतही निष्काळजीपणा
तपासणीदरम्यान स्वयंपाकघर अस्वच्छ असल्याचे आणि फरशीची अवस्था खराब असल्याचे आढळले. खिडक्या व दरवाज्यांतून कीटक आत येऊ नयेत, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक व्यवस्था नव्हती. अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबतचा तपासणी अहवालही उपलब्ध नव्हता.
याशिवाय कच्चे आणि शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे ठेवण्याऐवजी एकत्र साठवले जात असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. अन्नपदार्थ सुरक्षित तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक शीतकरण व्यवस्था, योग्य वायुवीजन, कचरा व्यवस्थापन आणि नियमित कीटक नियंत्रणाबाबतही गंभीर त्रुटी आढळल्या.
लेखी परवानगी मिळेपर्यंत हॉटेल बंद
या त्रुटींमुळे अन्न दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदींनुसार ८ ऑक्टोबर रोजी हॉटेलचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले.
या कारवाईनुसार हॉटेलमधील अन्न उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक आणि ग्राहकांना अन्नसेवा देण्याचे काम बंद करण्यात आले आहे. संबंधित त्रुटी दूर केल्यानंतर प्रशासनाकडून पुनर्तपासणी केली जाईल. त्यानंतर परवाना निलंबन उठविण्याचा स्वतंत्र लेखी आदेश मिळाल्याशिवाय हॉटेल पुन्हा सुरू करता येणार नाही.
अन्न व्यवसायात स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*