छत्रपती संभाजीनगर : नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या गुरुकृपा ट्रॅव्हल्सला शुक्रवारी पहाटे लाडगाव परिसरात भीषण अपघात झाला. सुमारे ५० प्रवासी असलेल्या या बसने महामार्गावरील दुभाजकाचे लोखंडी कठडे तोडत विरुद्ध बाजूचा रस्ता गाठला. पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली. या अपघातात एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून, काही जण जखमी झाले आहेत. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या दुर्घटनेत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने अनेकांचे प्राण वाचले.

शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. गुरुकृपा ट्रॅव्हल्स (सीजी ०८ बीएफ ३६००) नागपूरहून जालना महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे मार्गस्थ होती. लाडगावजवळील वळणावर बस चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट दुभाजकावर चढले. वेगाचा जोर इतका होता की, जवळपास ७० फूट लोखंडी रेलिंग उखडून बस पलीकडच्या मार्गावर गेली. त्यानंतर सुमारे १०० फूट पुढे जाऊन ती झाडावर आदळली.

धडकेमुळे बसचे मोठे नुकसान झाले. आवाज ऐकून लाडगावमधील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

या अपघाताची करमाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटण्यामागील कारणांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रशांत नांदवे आणि संजय सपकाळ तपास करीत आहेत.

समोरून वाहन आले असते तर…

बस दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली, त्या वेळी समोरून वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा समोरासमोर धडक होऊन अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. या घटनेने महामार्गावरील दुभाजकांची मजबुती आणि वळणांवरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,049 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!