पैठण : दारूच्या नशेत आई आणि बहिणींना शिवीगाळ करून सतत त्रास देणाऱ्या सख्ख्या लहान भावाची मोठ्या भावाने लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात उघडकीस आली. या प्रकरणाचा बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली. नवनाथ कान्हू एरंडे असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २५) सकाळी सुमारे ९ वाजता खाम जळगाव शिवारातील गट क्रमांक ७३ मधील घरासमोरील शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक आर. एम. तडवी आणि उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी परिसराची पाहणी केली. मृत तरुणाची ओळख श्रीराम कान्हू एरंडे (वय २६) अशी पटली.
श्रीरामच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याने फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. जखमांमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली.
तपासादरम्यान मृताचा मोठा भाऊ नवनाथ याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत श्रीराम दारूच्या नशेत आई आणि बहिणींना वारंवार शिवीगाळ करत असल्याचे समोर आले. मंगळवारी (दि. २४) रात्री पुन्हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने कुटुंबीयांना त्रास दिला. याच रागातून नवनाथने लाकडी दांड्याने श्रीरामच्या डोक्यावर तसेच हातापायांवर वार केले. या मारहाणीत श्रीरामचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी (दि. २६) नवनाथला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडाही जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठणच्या उपविभागीय अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एम. तडवी, उपनिरीक्षक मनोज पाटील तसेच अमोल मगर, राजू चव्हाण आणि सतीश साळवे यांनी ही कारवाई केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*



