छत्रपती संभाजीनगर : अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाई दुकाने, डेअरी आणि ऑनलाइन डार्कस्टोअरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने तब्बल १२ आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहेत.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांनी संबंधित आस्थापनांविरोधात निलंबनाचे आदेश जारी केले. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र साठवणे, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची योग्य विभागणी नसणे, अस्वच्छ स्वयंपाकघर, तुटलेल्या फरश्या, गंजलेली उपकरणे तसेच कीड नियंत्रणाचा अभाव अशा त्रुटी आढळल्या.
उस्मानपुरा येथील ब्लिंकिट स्टोअरमध्ये अन्न व अखाद्य वस्तू एकाच ठिकाणी साठवण्यात येत असल्याचे आढळले. एमआयटी कॅन्टीन, हॉटेल न्यू राज दरबार, राजदरबार मराठा हॉटेल, रॉयल हॉटेल आणि केजीएन केटरर्स यांसह विविध आस्थापनांमध्ये अन्न साठवणूक व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळले. वैजापूर आणि फुलंब्री तालुक्यातील हॉटेल, फरसाण सेंटर व मिठाई दुकानांमध्येही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. काही ठिकाणी पाणी व अन्नपदार्थांच्या परीक्षणाचे अहवाल, तापमान नियंत्रण आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या.
व्यवसाय बंद; सुधारणा केल्यानंतरच पुन्हा परवानगी
निलंबित आस्थापनांना अन्न तयार करणे, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी १५ दिवसांच्या आत सर्व त्रुटी दूर करून पुराव्यासह अहवाल सादर करणे आवश्यक आहे. फेरतपासणीत सुधारणा समाधानकारक आढळल्यानंतर आणि सक्षम प्राधिकाऱ्यांचे लेखी आदेश मिळाल्यावरच व्यवसाय पुन्हा सुरू करता येईल, असे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, वर्षा रोडे आणि प्रशांत अजिंठेकर यांच्या तपासणी अहवालांच्या आधारे करण्यात आली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*



