छत्रपती संभाजीनगर : घरातील सदस्य कामावर गेल्यानंतर रिकाम्या घरात हात साफ करण्याची संधी साधल्याचा आरोप घरकाम करणाऱ्या महिलेवर करण्यात आला आहे. कपाटातून दागिने गायब होण्याच्या प्रकाराने त्रस्त झालेल्या घरमालकिणीने अखेर सीसीटीव्हीचा आधार घेतला. मंगळवारी सकाळी लॉकर उघडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तिने संबंधित महिलेला पकडले. इंडोजर्मन टूल रूम क्वॉर्टर परिसरात हा प्रकार घडला.
सुनिता पडुळे (४५, रा. मिसारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी तिला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
रेल्वे विभागात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निलीमा मनोज ठाकरे (५६) या पतीसह परिसरातील क्वॉर्टरमध्ये राहतात. त्यांच्या घरी सुनिता गेल्या दहा महिन्यांपासून घरकाम करत होती. घरातील दोघेही सकाळी कामासाठी बाहेर पडत असल्याने घरात काही काळ कोणी नसत.
ऑक्टोबरमध्ये कपाटातून सोन्याचा चोकर, गोप आणि अंगठी मिळेनाशी झाली. घरात शोधाशोध करूनही वस्तू न मिळाल्याने निलीमा यांना घरकाम करणाऱ्या महिलेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी घरात कॅमेरे बसवून मोबाईलवरून नजर ठेवण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये सुनिता ड्रॉवर आणि कपाटांची तपासणी करताना दिसली.
मंगळवारी सुट्टी असल्याने निलीमा घरीच होत्या. बाहेर जात असल्याचे भासवून त्या घराबाहेर थांबल्या. मोबाईलवर लाइव्ह दृश्य पाहताना सुनिता देवघरातील ड्रॉवरमधून चावी घेऊन सोन्याचे लॉकर उघडताना दिसली. निलीमा यांनी तत्काळ घरात प्रवेश करून तिला पकडले; मात्र ती बहाणे करून निघून गेली.
चोरीस गेलेल्या ऐवजात दोन सोन्याचे गोप, मोहनमाळ, चोकर, कडा, दोन अंगठ्या, कानातील वेल, चांदीचे पैंजण आणि ५० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक राहुल बिघोत करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*