छत्रपती संभाजीनगर : मैत्रीच्या माध्यमातून जवळीक निर्माण करणे, लग्नाचे आश्वासन देऊन तरुणींना विश्वासात घेणे आणि नंतर त्यांच्याच खासगी क्षणांचा वापर आर्थिक फायद्यासाठी करणे, अशा गंभीर आरोपांमुळे शहरातील एक प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मोहंमद माझीन मोहंमद अब्दुल रशीद (३४, रा. काजीवाडा) याला परदेशात शोधून भारतात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सहा महिन्यांच्या तपासानंतर झालेल्या या कारवाईत सीबीआय आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी समन्वय साधला.
आरोपी महिलांशी संपर्क वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा तसेच कामाच्या ठिकाणाचा वापर करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. नोकरीच्या ठिकाणी ठरावीक कालावधीनंतर बदल करून तो नव्या महिला सहकाऱ्यांशी मैत्री करायचा. त्यानंतर लग्नाचे स्वप्न दाखवून त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जात असल्याचा आरोप आहे. या भेटींच्या वेळी खासगी व्हिडीओ तयार केले जात होते. पुढे लग्नाबाबत विचारणा झाल्यास हे व्हिडीओ प्रसारित करण्याची भीती दाखवून पैसे मागितले जात असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
काही महिलांकडून उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगूनही रक्कम घेतल्याचा आरोप आहे. आरोपीने अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय असून, सीबीआयच्या माहितीनुसार पीडित महिलांची संख्या १४ पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. शहर पोलिसांकडे सध्या चार महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
पत्नीच्या माहितीने तपासाला दिशा
या प्रकरणातील एक महत्त्वाचा खुलासा आरोपीच्या पत्नीशी झालेल्या संपर्कातून झाला. एका पीडितेने आरोपीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर तिच्याशी आरोपीच्या पत्नीने संवाद साधला. आपणही फसवणुकीला बळी पडल्याचे सांगत तिने अन्य महिलांबाबत माहिती दिली. या संवादानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि प्रकरणाचा तपास पुढे सरकला.
हॉटेलमधील हालचालींची चौकशी होणार
आरोपी औरंगपुऱ्यातील दोन हॉटेल्समध्ये वारंवार जात असल्याचे तपासात समोर आले आहे. कॅफेच्या नावाखाली तरुणींना तेथे नेले जात असल्याचा आरोप आहे. सततच्या भेटींमुळे संबंधित ठिकाणी त्याचे उधारी खाते असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या हॉटेल्सची भूमिका तपासली जात आहे.
आरोपी दुबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सागर देशमुख, सहायक निरीक्षक मनोज शिंदे आणि पोलिस अंमलदार अमोल सोनटक्के व सुरेश बोडखे यांच्या पथकाने परदेशातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. दुबईतून ताबा घेतल्यानंतर आरोपीला कोचीमार्गे शहरात आणण्यात आले.
शुक्रवारी रात्री शहरात पोहोचलेल्या आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. खासगी व्हिडीओंचा वापर, संभाव्य विक्री, अन्य पीडितांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संबंध याबाबत तपास सुरू आहे. पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी, त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे सहायक आयुक्त सागर देशमुख यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*