छत्रपती संभाजीनगर : रेशनवरील स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन सुधार’ मोहिमेची जिल्ह्यात जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेत आयकर विवरणपत्र (ITR) भरणारे, टॅनधारक, चारचाकी वाहनांचे मालक, अधिक उत्पन्न असूनही कमी उत्पन्न दाखविणारे तसेच ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे.

मागील वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ लाख ६५ हजार ९५३ रेशनकार्ड संशयित आढळले आहेत. त्यापैकी १ लाख २२ हजार ५१८ कार्डधारकांना प्राधान्य गटातून वगळून एनपीएच (नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड) प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचा स्वस्त धान्याचा लाभ बंद झाला असून, उर्वरित ४३ हजार ४३५ संशयित रेशनकार्डांची तपासणी सुरू आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सप्टेंबर २०२५ पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. एका कुटुंबाच्या नावे अनेक रेशनकार्ड असणे, कायमस्वरूपी स्थलांतरानंतरही जुन्या ठिकाणची नोंद कायम असणे, आधार व ई-केवायसीमधील त्रुटी, उत्पन्नाबाबत चुकीची माहिती देणे, विविध कंपन्यांचे संचालक असूनही स्वस्त धान्याचा लाभ घेणे, अशा बाबींची पडताळणी केली जात आहे.

जिल्ह्यात सुमारे ८ लाख रेशनकार्ड असून, त्यापैकी ५ लाख ५२ हजार कार्डांवर धान्य योजना लागू आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ५९ हजार ९१५ कार्ड अपात्र ठरविण्यात आले होते. पुढील तपासणीत काही लाभार्थ्यांचे लाखोंचे उत्पन्न, चारचाकी वाहनांची मालकी आणि अनेक वर्षांपासून धान्याची उचल न केल्याचेही समोर आले.

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित संशयित लाभार्थ्यांची सखोल तपासणी सुरू असून, अपात्र आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, केशरी रेशनकार्डधारक शेतकरी कुटुंबांना धान्याऐवजी दिल्या जाणाऱ्या रोख अनुदानापोटी आतापर्यंत ५८ कोटी ७४ लाख ५२ हजार ८४० रुपये बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत. जानेवारी २०२३ ते जून २०२५ या कालावधीतील अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, अद्याप ९२ लाख ४८ हजार ८८१ रुपयांचे अनुदान वितरित होणे बाकी आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

12 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!