छत्रपती संभाजीनगर : खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांची धावपळ सुरू असतानाच शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नियम अधिक स्पष्ट केले आहेत. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अर्जांची संख्या अधिक झाल्यास विद्यार्थ्यांची निवड लॉटरीद्वारे करावी लागणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आर्थिक व्यवहार किंवा ओळखीचा वापर करण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवेशासाठी अतिरिक्त पैसे मागणे, विविध प्रकारची आश्वासने देणे किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या शिफारशीवरून विद्यार्थ्यांना प्राधान्य देणे, अशा तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. आता उपलब्ध जागांनुसार प्रवेश देताना लॉटरीचा पर्याय अनिवार्य केल्याने निवड प्रक्रियेत समान संधी मिळण्यास मदत होणार आहे.
शाळांकडून गणवेश, पुस्तके आणि इतर साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याचा आग्रह धरला जात असल्याच्या तक्रारीही शिक्षण विभागाला मिळत आहेत. पाल्याच्या प्रवेशावर परिणाम होईल, या चिंतेमुळे अनेक पालक तक्रारी नोंदवण्यापासून दूर राहतात. अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याच्या आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रवेशासाठी वयाचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. नर्सरीसाठी ३० जून २०२७ पर्यंत तीन वर्षे, ज्युनिअर केजीसाठी ३० जून २०२८ पर्यंत चार वर्षे, सिनिअर केजीसाठी ३० जून २०२९ पर्यंत पाच वर्षे आणि पहिलीसाठी ३० जून २०३० पर्यंत सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पालक आणि विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, असे स्पष्ट केले आहे. नव्या निर्देशांमुळे प्रवेश प्रक्रियेत नियमबद्धता येऊन पालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*