छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा संकलन व्यवस्थेतील एक गंभीर प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या घंटागाड्याच शहराची हद्द सोडून वाळूज परिसरात फिरत असल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघड झाले. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल ५० दिवस सुरू होता. जीपीएस यंत्रणेच्या मदतीने या गाड्यांचा माग काढण्यात आला असून, संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेने वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉम कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या वाहनांनी करारानुसार ठरवून दिलेल्या मार्गावर आणि महापालिका हद्दीतच काम करणे अपेक्षित आहे. मात्र, २१ नोव्हेंबर रोजी प्रभाग चारमधील एमएच २० जीझेड ६६१२ क्रमांकाची घंटागाडी वाळूजमध्ये कचरा गोळा करताना आढळली. या घटनेनंतर प्रशासनाने वाहनांच्या जीपीएस नोंदी तपासल्या. त्यातून एमएच २० जीझेड ६६२९ आणि एमएच २० जीझेड ५५३५ या आणखी दोन गाड्याही हद्दीबाहेर कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.

१ ऑक्टोबरपासून या गाड्या शहराबाहेर कचरा संकलित करत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे शहरातील निर्धारित मार्गांवर कचरा उचलण्याचे काम प्रभावित झाले आणि अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी तिन्ही वाहनांची देयके रोखण्याचे तसेच प्रत्येकी एक लाख रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले. प्रतिदिन दोन हजार रुपये याप्रमाणे ५० दिवसांचा दंड देयकातून कपात होणार आहे.

या प्रकरणात संबंधित सहा कर्मचारी आणि शहर समन्वयकावरही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सावंगी परिसरातही काही घंटागाड्या महापालिका हद्दीबाहेर हॉटेल्स व मंगल कार्यालयांचा कचरा उचलत असल्याची बाब समोर आली आहे. जीपीएसमुळे उघड झालेल्या या प्रकाराने शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या नियंत्रणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

130 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!