छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी आता महापालिका प्रशासन अधिक नियोजनबद्ध पावले उचलणार आहे. पाणी कधी येणार, कमी दाबाने का येते, पाइपलाइनला गळती कुठे आहे, अशा प्रश्नांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण व्यवस्था विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यासोबतच पाणीगळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष दुरुस्ती पथकही कार्यरत केले जाणार आहे.

महापौर समीर राजूरकर यांनी दक्षिण कोरियातील जलव्यवस्थापनाचा अभ्यास केल्यानंतर शहरासाठी या नव्या संकल्पना मांडल्या आहेत. १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत सेऊल आणि डेजॉन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यास कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात १४ देशांतील जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रतिनिधींनी भाग घेतला होता.

तक्रार नोंदविण्यापासून निराकरणापर्यंत एकाच यंत्रणेत

महापालिकेकडून प्रस्तावित कस्टमर केअर युनिटमध्ये जवळपास १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. नागरिकांना फोन, व्हॉट्सअॅप आणि ऑनलाइन पोर्टलवरून आपली समस्या नोंदविता येईल. तक्रार दाखल झाल्यानंतर ती संबंधित अभियंत्यांकडे पाठविण्यात येईल. कामाची स्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना पाहता येणार असल्याने तक्रारी प्रलंबित राहण्यावर नियंत्रण ठेवता येईल.

दर आठ दिवसांनी तक्रारींचा आढावा घेण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. त्यामुळे कोणत्या भागातील समस्या वारंवार उद्भवतात आणि त्यावर किती कार्यवाही झाली, याची माहिती प्रशासनाला मिळू शकेल.

गळती रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत

दक्षिण कोरियातील के-वॉटर संस्थेच्या कामकाजातून पाणी वितरणाचे डिजिटल नियंत्रण, सेन्सर्सच्या साहाय्याने गळती शोधणे आणि पंपांचे स्वयंचलित व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. डिजिटल ट्विन आणि एससीएडीए प्रणालीच्या माध्यमातून जलपुरवठा यंत्रणेवर लक्ष ठेवण्याच्या पद्धतीही समजून घेण्यात आल्या.

या अनुभवाचा उपयोग छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करण्यासाठी केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरात तक्रारींचे वेळेत निराकरण आणि पाण्याची नासाडी कमी करणे, हे या प्रस्तावित उपाययोजनांचे प्रमुख उद्दिष्ट असेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

115 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!