छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या धार्मिक स्थळांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. भाविकांची वाढती संख्या, यात्रांच्या काळात होणारी गर्दी आणि अपुऱ्या सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्ह्यातील २० देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भातील प्रस्तावांची पडताळणी करून ते शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाला याबाबत स्पष्ट निर्देश दिले. अनेक गावांतील मंदिर, आश्रम, दर्गा आणि बुद्धविहार ही श्रद्धेची केंद्रे असून, त्याठिकाणी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. मात्र, पाणी, स्वच्छता, रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव जाणवत असल्याने अशा स्थळांना अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली होती.

तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर संबंधित स्थळांच्या विकासासाठी शासकीय मदतीचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे प्रस्तावांवर विलंब न करता कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याच बैठकीत सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जोगेश्वरी आणि इंद्रगडी मंदिराच्या यात्रेचा मुद्दाही चर्चेत आला. त्रिपुरारी पौर्णिमेला राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे येतात. यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडू नये, यासाठी सदस्या आशा गाढे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अध्यक्षांनी सिल्लोडच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठा करण्यास सांगितले.

घाटनांद्रा येथील मंदिराला सध्या ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. त्याचा दर्जा वाढवून ‘ब’ वर्ग करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याची सूचनाही देण्यात आली.

जिल्ह्यातील चापानेर, देवगाव रंगारी, सासेगाव, धारावीखेड, दाभाडी, महालगाव, घोसला, भांबरवाडी, मकरणपूर, ताडपिंपळगाव, देवळाणा, जांभरखेडा आणि माटेगाव यांसह विविध गावांतील २० धार्मिक स्थळांचे प्रस्ताव या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील धार्मिक स्थळांना विकासासाठी निधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

200 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!