छत्रपती संभाजीनगर : शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, चोरट्यांनी आता दिवसाढवळ्या बंद घरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नक्षत्रवाडी परिसरात शनिवारी एकाच भागातील दोन अपार्टमेंटमध्ये चोरीच्या घटना उघडकीस आल्या. दोन्ही ठिकाणी घरातील कपाटांचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान आवास वैदेही अपार्टमेंटमधील वैशाली प्रल्हाद शिंदे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर चोरांनी बंद घराचा फायदा घेतला. घरातील लाकडी कपाट आणि लॉकर फोडून सोन्याचे नेकलेस, कानातील झुंबर व सोन्याचे वेल असा ऐवज लंपास करण्यात आला. या दागिन्यांचे वजन सुमारे सव्वा तोळे असल्याचे सांगण्यात आले. दुपारी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दुसरी घटना श्रीहरी नक्षत्र अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०६ मध्ये घडली. खुशाल गोकुळ तुपे हे कामावर गेले होते, तर त्यांची पत्नी संजना मुलाखतीसाठी बाहेर पडल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटाचा लॉकर फोडून सोन्याचे फूल, मणी मंगळसूत्र आणि अंगठी चोरून नेली. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या लग्नासाठी हे दागिने खरेदी करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी १०.४५ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान या दोन्ही घरफोड्या झाल्या. कमी फ्लॅट असलेल्या इमारती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कमकुवत कुलूप असलेली घरे चोरट्यांकडून हेरली जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*