छत्रपती संभाजीनगर : शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांकडून आता अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात असल्याचे उल्कानगरीतील घटनेतून समोर आले आहे. अमृतसिद्धी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटचा दरवाजा चार्जिंग कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील लॉकर फोडून सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा १२ लाख ८० हजार ५०० रुपयांचा माल घेऊन चोरटे पसार झाले. बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विशाल सोन्नेकर (४२) हे बँकेत नोकरी करतात, तर त्यांची पत्नी शाळेत कंत्राटी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दोघेही कामासाठी बाहेर पडले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दुपारी बारा ते सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान घरफोडी केली.
सायंकाळी शेजारी राहणाऱ्या महिलेच्या निदर्शनास घराचा दरवाजा उघडा असल्याचे आले. त्यांनी सोन्नेकर यांना फोन करून माहिती दिली. घरी पोहोचल्यानंतर दरवाजाचा कडी-कोयंडा कापलेला आणि घरातील सामान विस्कटलेले दिसले. बेडरूममधील कपाटाचे लॉकरही फोडण्यात आले होते.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये २५२.५ ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन सोन्याची बिस्किटे, ५० ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि आठ हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.
दरवाजा फोडण्यासाठी पहारीचा वापर
चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कोयंडा कटरने कापला. बेडरूमचा दरवाजा उघडण्यासाठी लोखंडी पहारीने चौकटीवर सात घाव घातले. त्यानंतर कपाटातील लॉकर फोडून ऐवज लंपास केला.
जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेचे पथकही तपासात सहभागी झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*



