छत्रपती संभाजीनगर : मदतीसाठी किंवा पत्ता विचारण्यासाठी जवळ येणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका तरुणाला महागात पडले. चिकलठाणा परिसरात सेतू केंद्राचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन जणांनी तरुणाला थांबवले आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील ३८ हजार रुपये लुटले. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एटीएममध्येच ठेवले होते लक्ष

गोरक्षनाथनगर, चिकलठाणा येथील अक्षय सुधाकर पवार (२३) हा तरुण एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्याने प्रथम ३० हजार रुपये काढले. त्यानंतर वडिलांशी फोनवर चर्चा झाल्यावर आणखी ८ हजार रुपये काढण्यासाठी तो पुन्हा एटीएममध्ये गेला. याचवेळी तेथे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने अक्षयला स्वतःसाठी १० हजार रुपये काढून देण्यास सांगितले. मात्र, अक्षयने त्यास नकार दिला आणि पैसे घेऊन तो बाहेर पडला.

पत्ता विचारला अन् चाकूचा धाक दाखवला

एटीएममधून बाहेर पडलेल्या अक्षयच्या मागावर दोन अनोळखी व्यक्ती असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. काही वेळातच दोघांनी त्याला अडवले. ‘सेतू केंद्र कुठे आहे?’ अशी विचारणा करून त्यांनी त्याच्याशी संवाद सुरू केला. अक्षय त्यांना मार्ग सांगत असतानाच लाल शर्ट आणि निळी जीन्स घातलेल्या आरोपीने चाकू काढून त्याच्या मानेजवळ लावला. विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी देत त्याने अक्षयच्या खिशातील ३८ हजार रुपये हिसकावून घेतले.

दोघेही पसार; पोलिसांकडून तपास

लुटलेली रक्कम लाल शर्ट घातलेल्या आरोपीने हिरवा शर्ट आणि काळी पँट परिधान केलेल्या साथीदाराकडे दिली. त्यानंतर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अक्षय पवार याच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

716 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क