एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई; १ लाखांच्या तीन दुचाकी जप्त
छत्रपती संभाजीनगर : मुलीवर पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तीन तरुण चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. एन-१ सिडको परिसरातून चोरी झालेल्या दुचाकीचा अवघ्या काही तासांत शोध घेताना पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. आरोपींकडून सुमारे १ लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
संजय विनोद जाधवर (१९, रा. मदिना गल्ली, पडेगाव), सुशांत मंगेश भालेराव (२१, रा. शहानगर, मसनतपूर, सिंधीवन) आणि युवराज विष्णू चव्हाण (१९, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
२२ सप्टेंबर रोजी विशेष पथकाचे पोलिस अंमलदार पामस हॉटेल परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मोपेड स्कूटीवर तिघे तरुण ट्रिपल सीट जाताना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत संबंधित स्कूटी क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपींनी टाऊन सेंटर परिसरातून ‘पॅशन प्रो’ आणि ‘अॅक्टिव्हा’ अशा आणखी दोन दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी तिन्ही दुचाकी जप्त करून आरोपींना अटक केली.
अवघ्या दहा मिनिटांत चोरी
चोरटे दुचाकीच्या हँडल लॉकवर पायाने जोरदार लाथ मारून ते काही क्षणांत तोडत होते. त्यानंतर गाडी ढकलत पुढे नेऊन वायर थेट जोडून ती सुरू केली जात होती. संपूर्ण चोरीची प्रक्रिया अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण केली जात असल्याचे तपासात समोर आले. चोरी केलेल्या दुचाकी दोन दिवस अज्ञातस्थळी ठेवून त्यानंतर विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
ही कारवाई एपीआय भरत पाचोळे, उपनिरीक्षक राहुल विघोत, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे, परशुराम सोनुने आदींच्या पथकाने केली. निरीक्षक गणपत राहिरे यांनी या कारवाईची माहिती दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*