छत्रपती संभाजीनगर : अमरावतीकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आयशर ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारवाई केली. जयपूर टोलनाक्याजवळ केलेल्या या कारवाईत ५५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास जयपूर टोलनाक्याजवळ पोलिसांनी आयशर ट्रक (एमएच-४६-बीएफ-४२३५) अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून टोलनाक्याच्या एक्झिट पॉईंटजवळ ट्रक थांबवला.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये Royal Blended बाजीराव सुगंधित पान मसाल्याचे १५,३०० पुडे आढळले. या मालाची किंमत सुमारे ३० लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर MASTANI-216 Premium Chewing Tobacco चे १५,३०० पुडे मिळून आले. या मालाची किंमत ४ लाख ५९ हजार रुपये आहे.
अशा प्रकारे पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचे एकूण ३०,६०० पुडे जप्त करण्यात आले. याशिवाय सुमारे २० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ५५ लाख १९ हजार रुपये आहे.
या कारवाईत इस्माईल खैराती शेख (३६) आणि अकील खलील शेख (३६) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत हा माल अमरावतीतील जावेद हुरूप मेमन यांच्याकडून घेतल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच हा माल छत्रपती संभाजीनगरमधील अंजिठा किराणा स्टोअर्सच्या मालकाकडे पोहोचविण्यात येणार असल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*