छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी जन्मदात्या आई-वडिलांनी अवघ्या दीड महिन्याच्या पोटच्या गोळ्याला १ लाख २० हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या बाळाचा एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा सौदा करण्यात आला. दलालांनी बाळाची खरेदी-विक्री करून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचा नफा कमावला. अखेर मुकुंदवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत बाळाला सुखरूप परत आणले असून, जन्मदाते, दोन महिला दलाल, डॉक्टर आणि तेलंगणातील नातेवाईक महिलेसह सात जणांना अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांना बाळ नको होते. त्यांची अडचण ओळखून कौशल्या पवार हिने तिची मुलगी सीमा रेशवाल हिच्याशी त्यांची ओळख करून दिली. जन्मदात्यांनी १ लाख २० हजार रुपये घेऊन बाळ सीमा रेशवाल हिच्याकडे दिले.
यानंतर सीमा रेशवाल हिने हेच बाळ २ लाख ७० हजार रुपयांना संगीता आव्हाड हिला विकले. म्हणजेच, पहिल्या व्यवहारात तिला तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचा नफा झाला. पुढे संगीता आव्हाड हिने ८० हजार रुपये नफा घेत बाळाचा तिसरा सौदा ३ लाख ५० हजार रुपयांना केला. तेलंगणातील जगित्याल जिल्ह्यातील पिग्गेरला येथील डॉ. सुरेश राजाराम गुंटुका याच्याशी हा व्यवहार करण्यात आला. नांदेड येथे जाऊन संगीता हिने बाळ डॉक्टरच्या ताब्यात दिले.
डॉ. गुंटुका याने पुढे तेलंगणातील तालागड येथे राहणाऱ्या त्याच्या नातेवाईक उमा गंगाधर खटकम (४५) हिला हे बाळ ३ लाख ५० हजार रुपये घेऊन दिले. उमा ही बाळाच्या मातृत्वासाठी इच्छुक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, बाळ विकून मिळालेल्या पैशांतून जन्मदात्याने सोन्याची चेन आणि मोबाइल खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित वस्तू जप्त केल्या आहेत.
मुकुंदवाडी पोलिसांनी तपास करून दीड महिन्यानंतर बाळाला सुखरूप परत आणले. या प्रकरणातील आरोपींमध्ये जन्मदाते, कौशल्या पवार, सीमा रेशवाल, संगीता आव्हाड, डॉ. सुरेश गुंटुका आणि उमा खटकम यांचा समावेश आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे बाळाला या खरेदी-विक्रीच्या साखळीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*