छत्रपती संभाजीनगर : शहरातील बहुतांश वसाहतींना सध्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही काही नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर १६ ऑक्टोबरपासून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्यांदा पाण्याचा अपव्यय करताना आढळल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा २५ हजार रुपये दंडासह गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

मागील आठवड्यात आयुक्त येडगे यांनी टाऊन हॉल ते मकाई गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आसेफिया कॉलनी परिसराची पाहणी केली. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी वाहत असल्याचे आढळून आले. नागरिकांकडून पाण्याचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने या परिसरातील ३९ अनधिकृत नळ कनेक्शन तोडले. संबंधित नागरिकांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नळाला पाणी येत असताना तोट्या बंद ठेवाव्यात आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.

लीकेज आणि व्हॉल्व्हचीही दुरुस्ती

शहरातील अनेक भागांत किरकोळ लीकेज तसेच व्हॉल्व्हमधून पाणी वाहत असल्याचे आढळते. अशा ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

१ ते १५ ऑक्टोबर जनजागृती

महापालिकेकडून १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान घंटागाड्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ ऑक्टोबरपासून नियमांची अंमलबजावणी करून दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे.

शहरात सुमारे १ लाख ४० हजार नळ कनेक्शन असून, त्यापैकी २२ हजार व्यावसायिक कनेक्शन आहेत. प्रशासनाच्या अंदाजानुसार शहरात ७० ते ८० हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असण्याची शक्यता आहे. सध्या शहरासाठी जायकवाडी धरणातून दररोज सुमारे २२० ते २३० एमएलडी पाणी उचलले जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

107 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क