छत्रपती संभाजीनगर : मान्सूनचा पाऊस माघारी फिरल्यानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून, आकाश निरभ्र राहिल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. परिणामी छत्रपती संभाजीनगर शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी (2 ऑक्टोबर) शहराचे कमाल तापमान तब्बल 37 अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्यामुळे शहरवासीयांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आणि शुक्रवार अक्षरशः ‘फ्राय डे’ ठरला.
यंदा पावसात मोठे खंड पडल्याने सप्टेंबर महिन्यापासूनच उष्णतेची तीव्रता जाणवत होती. 23 सप्टेंबर रोजी 33.4 अंश असलेले कमाल तापमान सातत्याने वाढत गेले. 25 सप्टेंबरला ते 35.4, 27 आणि 28 सप्टेंबरला 35.8, तर 30 सप्टेंबरला 36.9 अंशांवर पोहोचले. 1 ऑक्टोबरला 36.5 अंश तापमानाची नोंद झाली आणि 2 ऑक्टोबरला पारा थेट 37 अंशांवर पोहोचला.
उकाडा वाढण्याची प्रमुख कारणे
सध्या सूर्य विषुववृत्तावरून दक्षिण गोलार्धाकडे सरकत आहे. या काळात महाराष्ट्राच्या अक्षांशावर सूर्यकिरणे तुलनेने अधिक थेट पडत असल्याने जमिनीचे तापमान वाढते. त्यातच मान्सूनच्या माघारीनंतर आकाश निरभ्र झाल्याने सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम जाणवत आहे.
ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मते, तापमान वाढल्यावर हवेचा दाब कमी होतो आणि ही पावसाची काही लक्षणे आहेत. त्यामुळे मुंबई तसेच किनारपट्टी भागात सध्या पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल-मे महिन्यातील उष्णता आणि सध्याची परिस्थिती मात्र वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जळगावमध्येही तापमानाची मोठी तफावत दिसून आली. 2 ऑक्टोबरला येथे राज्यातील सर्वाधिक 37.3 अंश कमाल, तर 18.2 अंश किमान तापमान नोंदले गेले. विशेष म्हणजे, या दिवशी जळगावचे किमान तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*