छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात सोमवारी (दि. ३) पहाटे ४.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत विविध रेल्वेस्थानके आणि धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दिवसभर चाललेल्या व्यापक कारवाईत विनातिकीट प्रवास, अनियमित प्रवास तसेच बुक न केलेले सामान घेऊन प्रवास करणाऱ्या एकूण १,०८७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५ लाख ९८ हजार ३३५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही विशेष मोहीम नांदेड–आदिलाबाद, नांदेड–परभणी–जालना–छत्रपती संभाजीनगर–मनमाड, परभणी–परळी वैजनाथ तसेच पूर्णा–अकोला या रेल्वे मार्गांवर राबविण्यात आली. मोहिमेत ३२ तिकीट तपासणी पथके सहभागी झाली होती. यामध्ये १४९ तिकीट तपासनीस, १४ स्टेशन तपासणी कर्मचारी, ४ विभागीय वाणिज्य निरीक्षक आणि ३ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी होते. या पथकांनी एकूण २९ रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी केली.
कारवाईदरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५१६ प्रवाशांकडून ४ लाख ४ हजार ५९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या १५७ प्रवाशांवर कारवाई करून १ लाख १७ हजार ३१० रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय बुक न केलेले सामान घेऊन प्रवास करणाऱ्या ४१४ प्रकरणांमध्ये ७६ हजार ४३५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तिकीट तपासणीसोबतच रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातही कारवाई करण्यात आली. अशा ५ प्रकरणांमध्ये संबंधितांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रेल्वे परिसरात अस्वच्छता (लिटरिंग) करणाऱ्या ४ जणांवर कारवाई करून १ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान धूम्रपानासंदर्भातील कोणतेही उल्लंघन आढळून आले नाही.
नांदेड विभागाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे, सामानाचे नियमानुसार बुकिंग करण्याचे आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, अशा विशेष तपासणी मोहिमा पुढील काळातही विविध रेल्वेस्थानकांवर सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*