छत्रपती संभाजीनगर : अलीकडच्या काळात प्री-वेडिंग शूटचे आकर्षण तरुणांमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. विवाहसोहळा अधिक खास आणि लक्षवेधी ठरावा यासाठी जोडपी विविध संकल्पना राबवत असून, प्रेक्षणीय स्थळे, गावराण पार्श्वभूमी आणि सिनेमॅटिक शैलीत शूट करण्याचा ट्रेंड वाढला आहे. या ट्रेंडमध्ये आता हेलिकॉप्टरचा समावेश झाल्याने प्री-वेडिंग शूटला एक वेगळाच ग्लॅमर प्राप्त झाला होता.
मात्र, गेल्या एक ते दोन वर्षांत देशात घडलेल्या काही हेलिकॉप्टर अपघातांच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी हेलिकॉप्टर वापरण्याची मागणी घटल्याचे चित्र आहे. हेलिकॉप्टर व्यावसायिक सुबोध जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी लग्न समारंभासाठी मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टर बुकिंग होत होते. गतवर्षी सुमारे ५० ते ६० बुकिंग झाली होती. मात्र यावर्षी आतापर्यंत लग्नासाठी एकाही व्यक्तीकडून चौकशी झालेली नाही.
असे असले तरी प्री-वेडिंग शूटसाठी हेलिकॉप्टरबाबतची उत्सुकता कायम असल्याचे दिसून येत आहे. लग्नाच्या तुलनेत प्री-वेडिंग शूटचा खर्च कमी असल्यामुळे अनेकांचा कल या पर्यायाकडे वळत आहे. लग्नासाठी हेलिकॉप्टर वापरल्यास सुमारे ५ लाख रुपयांचा खर्च येतो, तर प्री-वेडिंग शूटसाठी हा खर्च २ ते अडीच लाख रुपयांपर्यंत मर्यादित असतो.
प्री-वेडिंगसाठी साधारण अर्ध्या तासाचे शूट केले जाते. शहरात शूट केल्यास सुमारे १.२० ते १.३० लाख रुपयांचा खर्च येतो, तर शहराबाहेरच्या लोकेशनसाठी जाण्या-येण्याचा खर्च धरून एकूण खर्च २ ते अडीच लाखांपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे शूटनंतर वधू-वरांना हेलिकॉप्टर राईडची संधीही दिली जाते.
दरम्यान, मार्चनंतर प्री-वेडिंगसाठी हेलिकॉप्टर बुकिंगला पुन्हा गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लग्न समारंभात हेलिकॉप्टरचा वापर कमी झाला असला, तरी प्री-वेडिंग शूटमध्ये त्याचे आकर्षण अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*