छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या दहा दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामाजिक अन्नछत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर परिणाम झाल्याने ही टंचाई निर्माण झाली असून शहरातील आर्थिक चक्रावर त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत.

शहरातील शेंद्रा एमआयडीसी परिसरात गॅसअभावी कॅन्टीन चालकांनी चुलींवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. कामगारांसाठी नाश्ता व जेवण मर्यादित प्रमाणात बनवले जात असून मेनूमध्येही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. चुलीवर स्वयंपाक करणे हे कष्टदायक ठरत असल्याने कामगारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर सुमारे चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून पर्यायी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या लाकडाचे दरही ८ ते १० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

गॅस टंचाईचा परिणाम सामाजिक क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गारखेडा, ज्योतीनगर, समर्थनगर आणि घाटी रुग्णालय परिसरातील अनेक अन्नछत्रे सध्या बंद पडली आहेत. या अन्नछत्रांवर अवलंबून असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः गरजू नागरिकांसाठी ही अन्नछत्रे मोठा आधार होती, मात्र गॅसअभावी अन्ननिर्मिती थांबल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.

दरम्यान, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून फूड ऑर्डरमध्येही मोठी घट झाली आहे. गॅस तुटवड्यामुळे अनेक क्लाऊड किचन आणि खानावळ व्यवसायिकांनी ऑर्डर्स कमी केल्या असून सुमारे ५० ते ६० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. जास्त वेळ लागणारे व क्लिष्ट पदार्थ मेनूमधून वगळून फक्त सोप्या पदार्थांवर भर दिला जात आहे.

औद्योगिक क्षेत्रातही परिस्थिती गंभीर बनली आहे. ५ मार्चपासून औद्योगिक गॅसचा पुरवठा बंद असल्याने शहरातील ४०० हून अधिक उद्योग अडचणीत आले आहेत. ऑटोमोबाइल, बेव्हरेज, बॉटलिंग आणि फार्मा उद्योगांना याचा मोठा फटका बसत आहे. सध्या उपलब्ध साठ्यावर उत्पादन सुरू असले तरी तो संपल्यानंतर उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने १३ मार्च रोजी मर्यादित गॅस पुरवठ्याचे परिपत्रक जारी केले असले तरी परिस्थिती अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

289 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क