छत्रपती संभाजीनगर : शहरात बनावट विदेशी दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत हर्सूल परिसरातून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्याच्या शेकडो बाटल्या आणि वाहनासह एकूण 10 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात बनावट मद्याचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, हर्सूल ते पिसादेवी रोड परिसरातील काही धाब्यांवर चारचाकी वाहनातून बनावट विदेशी दारूचा पुरवठा केला जाणार आहे. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी तत्काळ सापळा रचला. संशयित वाहनावर लक्ष ठेवून त्याचा पाठलाग करण्यात आला आणि योग्य संधी साधून वाहन थांबवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहन क्रमांक MH-20-GV-7759 या टोयोटा रुमिओन कारमधून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या तब्बल 528 बाटल्या आढळून आल्या. प्राथमिक तपासात या बाटल्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या बनावट मद्याचा पुरवठा शहरातील काही धाबे व इतर ठिकाणी केला जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणात विक्रम वाघ, अनिकेत करारे, कपिल क्षीरसागर, मिलिंद अहिरे आणि ओम गुंडलेकर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून बनावट मद्याच्या बाटल्या आणि कार असा एकूण 10 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत विभागाच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड करत आहेत. विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून बनावट मद्य पुरवठ्याच्या संपूर्ण जाळ्याचा शोध घेतला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*