छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणात विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या तिघांचा सहभाग समोर आला आहे. गुन्हेगारी चित्रपट आणि वेबसीरिजचा प्रभाव घेऊन मुख्य आरोपी विशाल राठोडने हा संपूर्ण कट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी विशाल राठोडने गेवराई तांडा परिसरातील एका निर्जन शेतात ‘येथे गुप्तधन आहे’ अशी थाप मारत जेसीबी चालकाकडून तब्बल आठ फूट खोल असे दोन खड्डे खोदून घेतले. दोन दिवसांनी म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी त्याने प्रा. लोंढे यांना पार्टीचे निमंत्रण दिले. त्या दिवशी सायंकाळी लोंढे यांनी त्यांच्या वैयक्तिक चालकाला घरी नॉनव्हेज जेवण बनवण्यास सांगितले होते. जेवणानंतर रात्री सुमारे नऊच्या सुमारास विशालचा फोन आला आणि त्याने पार्टीसाठी बोलावले.

विशालच्या गाडीत आधीच चार जण बसले असल्याने लोंढे यांनी चालकाला सोबत न घेता स्वतःच विशालसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वजण दौलताबाद परिसरातील एका फार्महाऊसमध्ये गेले. तेथे आरोपींनी लोंढे यांना मद्यपान करायला लावले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या पार्टीत दोन महिला देखील उपस्थित होत्या.

रात्री सुमारे अडीच वाजता सर्वजण परत निघाले. साजापूर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोहोचल्यावर विशालने लोंढे यांच्या जवळ असलेली बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह कारच्या डिकीत टाकला आणि रात्रभर शहरात सुमारे ३० ते ४० किलोमीटरपर्यंत फिरत राहिले.

पुढील दिवशी पहाटे सुमारे सहा वाजता आरोपी विशाल राठोडने गेवराई तांडा परिसरात आधीच खोदलेल्या खड्ड्यात लोंढे यांचा मृतदेह पुरला. त्यानंतर सकाळी सुमारे ११ वाजता त्याने पुन्हा जेसीबी चालकाला बोलावून ‘पोलिस केस होईल’ अशी भीती दाखवत तो खड्डा बुजवून घेतला.

दरम्यान, तपासाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी वेगवेगळे प्रयत्न केले. ८ फेब्रुवारी रोजी विशाल लोंढे यांचा मोबाईल घेऊन पुण्याला गेला आणि त्या मोबाईलवरून “I’m in personal work – 20, 25 don’t disturb” असे तोडक्या-मोडक्या इंग्रजीत स्टेटस ठेवले. मात्र प्राध्यापक असलेली व्यक्ती अशा प्रकारे चुकीचे इंग्रजी लिहिणार नाही, हा मुद्दा पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांचा संशय अधिक बळावला.

या प्रकरणात सहआरोपी आकाश पवारने सुरुवातीला “मी दारूच्या नशेत होतो, मला काहीच आठवत नाही. मी गाडीत मागच्या सीटवर झोपलो होतो,” असा दावा केला. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पुढच्या सीटवर बसलेला दिसून आला. तसेच पार्टीतील महिलांनीही लोंढे नशेत होते, पण आरोपी पूर्ण शुद्धीत होते, असे सांगितल्याने त्याची थाप उघड झाली.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. प्रा. लोंढे यांना गाण्याची प्रचंड आवड होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांची ओळख इव्हेंट मॅनेजमेंट आणि लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या विशाल राठोडशी झाली होती. त्यावेळी विशालने ‘लव्ह अँड डिअर’ नावाचा रिअॅलिटी शो सुरू करण्याचे आश्वासन देत लोंढे यांच्याकडून तब्बल ५० लाख रुपये उकळले होते. मात्र तो शो कधीच सुरू झाला नाही. हे पैसे परत मागण्यासाठी लोंढे यांनी वारंवार तगादा लावल्यानेच हा खून घडल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, १० मार्च रोजी लोंढे यांचे नातेवाईक बेपत्ता प्रकरणी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना भेटले. त्यानंतर तपासाला वेग आला. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर, प्रवीण वाघ आणि अर्जुन कदम यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. अखेर १४ मार्च रोजी विशाल आणि आकाश यांच्यावर संशय बळावला आणि १५ मार्च रोजी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,453 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क