छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून हॉस्पिटलची बदनामी करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई १३ मार्च रोजी एन-१२ हडको परिसरातील सत्यविष्णू हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून एक कार आणि सहा मोबाइल जप्त केले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जफर नुर खटीक, मोहम्मद समीर मोहम्मद जाकीर, सय्यद मुशाहिद अली मुमताज अली, शाईन बानो अबु हमजा, रुबीना हबीब कुरैशी आणि सिद्धार्थ कैलास रायमाळे (सर्व रा. धुळे) यांचा समावेश आहे. या प्रकरणात डॉ. इफ्तेखार गफ्फार पटेल (वय ५२, रा. एन-१२ हडको) यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डॉ. पटेल यांच्या सत्यविष्णू हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात. धुळे येथील हमजा अन्सारी यांनी मार्च २०२३ मध्ये या हॉस्पिटलमध्ये सुमारे चार महिने उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांनी इतरत्र उपचार घेतले. सुमारे दोन वर्षांनंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा आधार घेत रुग्णाचे काही नातेवाईक डॉक्टरांकडे आले आणि हॉस्पिटलचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.
आरोपींनी वारंवार फोन करून डॉक्टरांना धमकावत पैसे देण्याचा दबाव टाकला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत “तुझ्यासाठी कबर खोदून ठेवली आहे” असेही सांगितले. घाबरलेल्या डॉ. पटेल यांनी आरोपींच्या मोबाइल क्रमांकावर फोनपेद्वारे पाच हजार रुपये पाठवले.
यानंतर डॉ. पटेल यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचत पाच लाख रुपयांची बनावट रक्कम तयार केली. खेळण्यांच्या नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या ५०० रुपयांच्या नोटा ठेवून बॅग तयार करण्यात आली. १३ मार्च रोजी आरोपी पैसे घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांनी त्यांना बॅग दिली आणि पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहाही आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*