छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सोमवार (दि. १६) पासून एका सत्रात भरणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२.३० अशी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेत भरत असलेल्या शाळा आता त्या वेळेत भरणार नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. शनिवारी तापमान तब्बल ३७.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. प्रखर उन्हामुळे विशेषतः लहान विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. अनेक शाळांच्या इमारतींवर लोखंडी पत्र्याचे छप्पर असल्याने वर्गखोल्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अस्वस्थता जाणवत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून शाळांची वेळ सकाळी लवकर करण्याची मागणी करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रकानुसार शाळा सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुपारी १२.३० वाजता सुटतील. दरम्यान, शाळांमध्ये अर्ध्या तासाची मधली सुट्टीही देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या संदर्भात शुक्रवार (दि. १३ मार्च) रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे. या पत्राला मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची संमती असून प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच शाळांची वेळ कमी असली तरी सोमवार ते शनिवार या कालावधीत नियमितपणे पूर्ण आठवडा शाळा सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि वाढत्या उष्णतेचा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

987 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क