छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत लवकरच १० स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठीचा कार्यक्रम मनपा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज वितरण, स्वीकृती व छानणीची प्रक्रिया मार्च महिन्यात पार पडणार आहे.
महापालिकेच्या नगर सचिव कार्यालयातून १८ मार्च ते २५ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना हे अर्ज उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर पूर्ण भरलेले अर्ज २४ मार्चपासून स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, ३० मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत.
३० मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छानणी १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्तांच्या दालनात करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाईल.
छानणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त सभागृह नेता, विरोधी पक्षनेता तसेच सर्व गटनेत्यांशी चर्चा करून तौलनिक संख्याबळानुसार प्रस्ताव तयार करतील. हा प्रस्ताव पुढे महापौरांकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडण्यात येईल आणि सभेत महापौर स्वीकृत सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती उपायुक्त तथा नगरसचिव नंदकिशोर भोंबे यांनी दिली.
दरम्यान, महापालिकेत एकूण १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असून, त्यात तौलनिक संख्याबळानुसार पक्षनिहाय वाटप केले जाणार आहे. यात भाजपचे सर्वाधिक ५ सदस्य, एमआयएमचे ३ सदस्य, तर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचा प्रत्येकी एक सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या निवडीकडे आता शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*