छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या एप्रिल महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) पूर्णपणे अद्ययावत करण्यात आली असून, या प्रणालीद्वारे बसचे अचूक स्थान आणि ती बस नियोजित ठिकाणी किती वेळात पोहोचेल याची माहिती घरबसल्या मिळणार आहे.
प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने काळानुरूप विविध सुधारणा सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व एसटी बसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. या प्रणालीमुळे प्रत्येक बसचे लाईव्ह लोकेशन नियंत्रण कक्षातून पाहता येते. त्यासाठी तयार करण्यात आलेले ‘आपली एसटी’ हे मोबाईल अॅप सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वापरात आणण्यात आले असून, सर्वांना ते डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील विविध आगारांतून सध्या ई-बससह सुमारे ५५० बस विविध मार्गांवर धावत आहेत. या बस नेमक्या कुठे आहेत, कोणत्या मार्गावर आहेत आणि त्या नियोजित स्थानकावर किती वेळात पोहोचतील, याची माहिती मिळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक चाचण्या सुरू होत्या. या चाचण्यांदरम्यान आढळलेल्या तांत्रिक उणिवा दूर करण्यात आल्या असून, आता ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या तयारीत आहे.
या प्रणालीमुळे प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत तासन्तास थांबावे लागणार नाही. मोबाईल अॅपवर बसचे लाईव्ह लोकेशन पाहून प्रवासी आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करू शकतील. सध्या अधिकाऱ्यांना सर्व बसचे अपडेटेड लोकेशन दिसत असून, लवकरच ही सुविधा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. एप्रिल महिन्यात अॅप अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर त्याचा वापर कसा करावा याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*