छत्रपती संभाजीनगर : विभागीय सहसंचालक कार्यालयातून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देतो, असे सांगून निवृत्त महिला सफाई कामगाराच्या मुलाकडे १८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी (दि. २४) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे विद्यापीठात आणि उच्च शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सदर महिला कर्मचारी विद्यापीठातून सफाई कामगार पदावरून निवृत्त झाल्या असून, त्यांना सातव्या वेतन आयोगाचा ३ लाख ६३ हजार ६१९ रुपयांचा फरक मिळणे बाकी आहे. ही रक्कम विभागीय सहसंचालक कार्यालयातून मिळवून देण्याच्या बदल्यात विद्यापीठातील शिपाई रूपचंद बाबुलाल मुंगसे (वय ५४) आणि दीपक नंदकिशोर रॉय (वय ५९) यांनी निवृत्त महिलेच्या मुलाकडे १८ हजार रुपयांची लाच मागितली होती.

महिलेच्या मुलाला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अमोल धस यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. त्यात दीपक रॉय याने तक्रारदाराकडून १८ हजार रुपये घेताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस व अंमलदार युवराज हिवाळे यांनी केली. पुढील तपास सुरू असून, आणखी काही कर्मचाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,063 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क