छत्रपती संभाजीनगर : शहरातील अरीहंतनगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली असून, चोरट्याने कोणताही आवाज न करता आणि घराचे अथवा कपाटाचे कुलूप न तोडता तब्बल २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अनिता रघुनाथ ठाकूर (वय ४९, रा. अरीहंतनगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी त्या त्यांच्या आईसोबत राममंदिरात भजनासाठी गेल्या होत्या. सायंकाळी परतल्यानंतर त्यांच्याच आईने घराचा दरवाजा उघडला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठाकूर यांना पलंगावर सोन्याचे दोन मणी पडलेले आढळले. यावरून संशय आल्याने त्यांनी कपाट तपासले असता, ते नीट बंद अवस्थेत होते. मात्र कुलूप उघडून पाहिल्यावर आत ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
चोरी गेलेल्या ऐवजामध्ये
- २५ ग्रॅम वजनाचे ७० हजारांचे सोन्याचे गंठण,
- १५ ग्रॅमचे ४५ हजारांचे मिनी गंठण,
- ९ ग्रॅमची २० हजारांची चैन,
- ५ ग्रॅमचे १५ हजारांचे झुंबर,
- एक ग्रॅम वजनाचे तीन वेढे व सहा ग्रॅमचा एक वेढा मिळून २० हजारांचा ऐवज,
- १० हजारांची लेडीज अंगठी,
- १० हजार रोख रक्कम आणि
- ४५ हजारांची दोन पदरी मोहन माळ
अशा प्रकारचा ऐवज असून, एकूण २ लाख ३५ हजार रुपयांची चोरी झाली आहे.
घरातील इतर सदस्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक केदारे करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*