छत्रपती संभाजीनगर : मूल्यांकनकाराशी संगनमत करून सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने बँकेत तारण ठेवून तब्बल १० लाख १ हजार रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. या प्रकरणी महिला ग्राहकासह बँकेचा अधिकृत मूल्यांकनकार पवन वर्मा (रा. नवजीवन कॉलनी, हडको) यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात १० लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२५ मध्ये घडला असून, ४ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता विनोद गाडेकर (४१, रा. चिकलठाणा) या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बजरंग चौक शाखेच्या व्यवस्थापक आहेत. संबंधित महिला सोने तारण कर्जासाठी बँकेत आली होती. बँकेच्या नियमानुसार दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी अधिकृत व्हॅल्युअर पवन वर्मा याला पाचारण करण्यात आले. त्याने दागिने शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर महिलेला दोन टप्प्यांत कर्ज मंजूर करण्यात आले.

२१ ऑगस्ट २०२५ रोजी महिलेने ३०.६० ग्रॅम वजनाच्या बांगड्या आणि २५.२० ग्रॅमचे ब्रेसलेट तारण ठेवले. वर्माने हे दागिने ९० टक्के शुद्ध असल्याचे प्रमाणित केले. त्यावरून बँकेने ३ लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज दिले.

त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी तिने १९.८८ ग्रॅमचा नेकलेस, ३.१४ ग्रॅमची अंगठी, ७.८२ ग्रॅमचे झुमके आणि ७१.९८ ग्रॅमच्या बांगड्या, असे एकूण १०२ ग्रॅम दागिने तारण ठेवले. यावेळीही वर्माने दागिने ९१ टक्के शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र दिले आणि ६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले.

दरम्यान, बँकेच्या नियमानुसार १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुसऱ्या मूल्यांकनकारामार्फत पुनर्मूल्यांकन करण्यात आले. ज्ञानेश्वर चिंतामणी यांनी दागिन्यांची तपासणी केली असता, ते शुद्ध सोन्याचे नसून केवळ सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने असल्याचे उघड झाले.

या कर्जाची थकबाकी सध्या १० लाख ४८ हजार ९०१ रुपये असून त्यावर व्याजही वाढत आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,006 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क