छत्रपती संभाजीनगर : शहरातील उल्कानगरी परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय शिक्षिका महिलेला ‘ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अडकवून तब्बल एक महिना सायबर भामट्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कालावधीत आरोपींनी महिलेकडून तब्बल ६१ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेली महिला लीना नांदापूरकर (वय ५५) या आपल्या वृद्ध आईसोबत उल्कानगरीत राहतात. ४ मार्च रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉलवर दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्याने ‘तुमच्या आधारकार्डचा वापर ड्रग्ज तस्करी व मनी लाँड्रिंगसाठी झाला आहे, त्यामुळे मुंबईत चौकशीसाठी हजर व्हावे लागेल,’ असे सांगितले. यावर महिलांनी नकार दिल्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉलवर डिजिटल अरेस्ट करण्यात आले. व्हिडिओ कॉलद्वारे एका पोलिस ठाण्याचा हुबेहूब सेटअप दाखवण्यात आला. पोलिसांची भूमिका करणारे व्यक्ती एकमेकांशी ‘जय हिंद’ अशा शब्दात संवाद साधत होते. बॅकग्राउंडला कुलाबा पोलिस ठाण्याचा बोर्ड, महात्मा गांधी यांचा फोटो होता, त्यामुळे महिलेला विश्वास वाटला.
चौकशी चालू आहे, असे सांगून महिलेला तिच्या खात्यातील सर्व रक्कम सरकारी खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यांनी म्युच्युअल फंडमधील ४५ लाख ३० हजार रुपये व आईच्या खात्यातील ५ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सायबर भामट्यांनी तिला पुन्हा संपत्तीचे व्हॅल्युएशन करून उर्वरित रक्कम भरण्याचे आदेश दिले. महिलेला राष्ट्रप्रेमाच्या भावनिक सादेने गुंगवण्यात आले. ‘देशात ड्रग्जचे रॅकेट चालू असून, तुमचे सहकार्य संविधानाच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे,’ असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्यात आला.
त्यानंतर महिलेला गोल्ड लोन, बचत गट व ओळखीच्या लोकांकडून पैसे उधार घेऊन उर्वरित ६ लाख रुपये भरावे लागले. प्रत्येक रकमेच्या बदल्यात तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व सीबीआयचे बनावट लोगो असलेली पावती देण्यात आली. एकूण एक महिना व्हिडिओ कॉल वा ऑडिओ कॉलवर महिलेला अडकवून ठेवण्यात आले. याच दरम्यान, त्यांच्या आईची प्रकृती बिघडली. रुग्णालयात नेल्यानंतर मोबाईल बंद झाल्यामुळे चोरट्यांचा संपर्क तुटला. नंतर पुन्हा फोन आल्यावर त्यांनी आस्थेवाईकपणे आईची विचारपूस करत विश्वास कायम ठेवला.
परंतु काही दिवसांनी फोन पूर्णपणे बंद झाल्यावर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सायबर क्राईम विभागाकडून तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*