छत्रपती संभाजीनगर: शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, लॉकेट अशा दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. विशेषतः दुचाकीवरून येत सोनसाखळी हिसकावून पळून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मंगळवारी (२२ एप्रिल) एकाच दिवशी अवघ्या एका तासाच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पहिली घटना सायंकाळी पाचच्या सुमारास काल्डा कॉर्नर परिसरात घडली. पूनम गोपाल नावंदर (४३), रा. राठी टॉवर्स, दशमेशनगर या होमिओपॅथी डॉक्टर आपल्या मैत्रिणीकडून परतत होत्या. साडेपाचच्या सुमारास त्या वर्मा रिक्षा स्टँडजवळ पोहोचल्या असता, दोन चोरटे दुचाकीवर बसून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. डॉक्टर पूनम यांच्याजवळ येताच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मिनी गंठण हिसकावले आणि दुचाकीवरून पळ काढला. या घटनेचा तपास उस्मानपुरा पोलिस करत असून, संबंधित गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुसरी घटना याच दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सातारा परिसरातील डीएसपी स्कूलजवळ घडली. माया सतीश पटवर्धन (६२, रा. संग्रामनगर) या त्यांच्या शेजारीण अश्विनी कदम यांच्यासोबत पायी फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दीड तोळ्याचे मिनी गंठण हिसकावले. घटना घडल्यानंतर चोरटे रेणुकामाता कमानीच्या दिशेने पळून गेले. माया पटवर्धन यांनी सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही घटना अवघ्या एका तासाच्या अंतराने घडल्याने पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यापूर्वी उल्कानगरीतही महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार घडला होता. दिवसाढवळ्या शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*