छत्रपती संभाजीनगर : CJPच्या कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर संस्थापक अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत CJP च्या पुढील वाटचालीची रूपरेषा जाहीर केली. यावेळी त्यांनी ‘क्या बोलती पब्लिक’ या राष्ट्रव्यापी मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या जाणार असल्याचे दीपके यांनी सांगितले.

युवकांचे शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महागडे शिक्षण यामुळे पालकांवर पडणारा आर्थिक भार हे CJPच्या आगामी आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांना परवडणारी तसेच गुणवत्तापूर्ण असावी, यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

लहान मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांची फी भरावी लागत असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवत असल्याचे दीपके यांनी नमूद केले. तसेच देशातील राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, शिक्षण व्यवस्था आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

जंतर-मंतरवरील आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद हा केवळ शिक्षण व्यवस्थेविरोधातील नाराजीपुरता मर्यादित नसून, जनतेच्या व्यापक असंतोषाचे प्रतिबिंब असल्याचे दीपके म्हणाले. जंतर-मंतरसह बंगाल, मुंबई आणि चेन्नईमध्येही नागरिकांचा हा असंतोष दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

‘देशाची भीती संपली, लोक रस्त्यावर उतरत आहेत’, असा दावा करत नागरिक आता आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवत असल्याचे दीपके यांनी नमूद केले. महापुरुषांच्या विचारांवर चालत लोकांचा आवाज देशभर पोहोचविण्याचे काम CJP करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, CJP राजकीय पक्ष स्थापन करणार का, या प्रश्नावर दीपके यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “देशाला आणखी एका राजकीय पक्षाची गरज नसून एका भक्कम दबावगटाची गरज आहे. आम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, तर ‘प्रेशर ग्रुप’ म्हणूनच काम करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

798 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क