छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि शाश्वत आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्टपासून क्रांती चौक येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा समन्वयकांनी केली आहे. सरकारने ८ ऑगस्टपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले की, आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी आंदोलनाच्या भूमिकेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गुरुवारी विभागीय आयुक्तांनी समन्वयकांसोबत बैठक घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. यावेळी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पत्रकार परिषदेला प्रा. माणिकराव शिंदे पाटील, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, योगेश शेळके, सुनील कोटकर, प्रशांत इंगळे, पंढरीनाथ गोडसे यांच्यासह अन्य समन्वयक उपस्थित होते. अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे अन्नत्याग आंदोलन करणार असून, सर्व समन्वयक त्यांच्या सोबत राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

समन्वयकांनी सांगितले की, १ सप्टेंबर २०२३ पासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली; मात्र समाजाच्या पदरात ठोस काहीही पडले नाही. सरकारने काढलेल्या अध्यादेशांमुळे समाजाची दिशाभूल झाली असून ते संविधानाच्या चौकटीत बसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

बैठकीत हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, एसईबीसी आरक्षणधारकांना ओबीसीप्रमाणे सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात, मराठा आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह सात प्रमुख मागण्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तसेच ११ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, ८ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास ९ ऑगस्टपासून क्रांती चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा निर्धार समन्वयकांनी व्यक्त केला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

217 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क