छत्रपती संभाजीनगर : शहरातील नियंत्रण कक्षात बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणाऱ्या एका तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. दिपक शाहूवा ढोके (रा. बी/२७/२, एन-११ दत्त मंदिराजवळ, टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर व हल्ली मुक्काम फ्लॅट नंबर ४०७, शुभम पॅलेस, चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.५७ वाजता नियंत्रण कक्षाच्या लॅंडलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने हिंदीतून फोन करून “विलास डोईफोडे बॉम्ब ब्लास्ट करणारा आहे, मस्जिदमध्ये” अशी माहिती दिली. नाव व पत्ता विचारताच फोन कट करण्यात आला. सदर माहिती गंभीर असल्याने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आयुक्तांनी तातडीने गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. संबंधित मोबाईल धारकाचा तांत्रिक तपास करण्यात आला असता, दिपक ढोके याचे नाव समोर आले. तसेच, ज्या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला होता, विलास डोईफोडे याचा शोध घेतला असता, तो निर्दोष आढळला.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील तलवाडा येथे मस्जिदमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व मस्जिद परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा पत्ता पुण्यातील धनकवडी येथे शोधण्यात आला. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ३० तासांच्या प्रयत्नानंतर व न्यायालयीन वॉरंट घेऊन दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नात आरोपीने दरवाजा उघडला. आरोपीस ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
चौकशीत दिपक ढोके याने केवळ पोलीसांना त्रास देण्यासाठी खोटा फोन केल्याचे उघड झाले. त्याच्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. मात्र, पोलीसांनी गंभीरपणे तपास सुरू ठेवला आहे.
पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खोट्या माहितीचा प्रसार करू नये. असे प्रकार गंभीरपणे घेतले जातील व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*