छत्रपती संभाजीनगर : सोमवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. रस्ते सामसूम असताना अचानक एका रिक्षाचा ताबा सुटला आणि रिक्षा उलटून भीषण अपघात झाला. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन तरुणी गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत.
अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षा पूर्णपणे उलटली आणि चालक आतमध्येच अडकून पडला. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी देवदूतासारखी भूमिका बजावत रिक्षामध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने रिक्षाचा पत्रा कापला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर जखमींना बाहेर काढून तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीअंती रईस हासिम शेख आणि रुक्मिणी येणगे या दोघांना मृत घोषित केले. या अपघातात शितल मोरे आणि पायल वरदे या दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अपघातातील सर्वजण रांजणगाव येथील शिवनेरी कॉलनीतील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. एकाच परिसरातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिवनेरी कॉलनीत शोककळा पसरली आहे. मध्यरात्रीच्या शांततेत घडलेला हा थरारक अपघात आणि त्यानंतर आलेली दुःखद बातमी मृतांच्या कुटुंबीयांसाठी आणि परिसरातील नागरिकांसाठी सुन्न करणारी ठरली आहे. या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*