आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने यंदाही विशेष वाहतूक व्यवस्था उभारली. या विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला तब्बल ४१ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

वारीच्या काळात राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह विविध विभागांतून पंढरपूरसाठी सुमारे ५,५०० विशेष एसटी बसेस चालविण्यात आल्या. या बसांनी एकूण २१ हजार ५२७ फेऱ्या पूर्ण करत ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांना सुरक्षित आणि सुखरूप प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.

यंदाच्या वारीत लाखो वारकऱ्यांनी एसटीवर विश्वास दाखवत विठ्ठल दर्शनासाठी प्रवास केला. या माध्यमातून केवळ महसूल वाढला नाही, तर भाविकांना वेळेत आणि सुरक्षित सेवा देण्याचे मोठे कार्यही एसटी महामंडळाने पार पाडले. त्यामुळे ‘लालपरी’ पुन्हा एकदा वारकऱ्यांची विश्वासू साथीदार ठरली.

याबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरपूरकडे जातात. अशा भाविकांना सुरक्षितपणे विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचवणे आणि दर्शनानंतर सुखरूप घरी आणणे, ही केवळ वाहतूक सेवा नसून ती विठ्ठलसेवाच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भाविकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि उत्कृष्ट नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी एसटी महामंडळासाठी आर्थिकदृष्ट्याही लाभदायक ठरली असून, भविष्यातही भाविकांना अधिक दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

121 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क